कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
आई, वडिलांना अभिमान वाटेल, असे आपण जगले पाहिजे. त्याच्यासारखे दुसरे कोणतेही सुख नाही. ते शरीराने हयात नसले तरीही हृदयस्थ असतात. सर्वांनी आई, बापाला काळजात बसवून त्यांच्या प्रती कृतज्ञता आयुष्यभर व्यक्त करुयात, असे प्रतिपादन व्याख्याते अण्णासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.
तांबवे, ता. कराड येथे स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे स्व. ज्ञानदेव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कृतज्ञता मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अण्णासाहेब शिंदे म्हणाले, आईची माया लवकर समजते, वडिलांची माया समजायला उशीर होतो. आजची पिढी भरकटत चालली असून, आई, वडिलांविषयी कृतघ्न बनत आहे. आई, वडिलांचे झिजणे जाणून घेवून त्यांच्यासाठी जगले पाहिजे. आई, वडिलांच्या आशिर्वाद शिवाय जीवनात कोणताच चमत्कार घडू शकत नाही. विलासराव पाटील- पोतलेकर यांनी प्रास्ताविक केले. राहूल साठे यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच विजय पाटील यांनी आभार मानले.
याप्रसंगी जिजाऊ वसतिगृहाचे नदाफ दांपत्य, सायकल दुकानदार वसंत पवार, पांडुरंग वाडते तसेच शिक्षण संस्था चालक, शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. यावेळी तांबवे येथील स्वा. सै. अण्णा बाळा पाटील विद्यालय, सुपने येथील श्री केदार विद्यालय, वसंतगड येथील वि. ग. माने हायस्कूल, बेलदरे येथील न्यू इंग्लिश स्कूल, उत्तर तांबवे येथील कै. दत्तात्रय उत्तमराव यादव हायस्कूल तसेच तांबवे, दक्षिण तांबवे, उत्तर तांबवे येथील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच तांबवे पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.