Monday, February 6, 2023

मराठवाड्यासाठी पॅकेज जाहीर करा; केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडांची राज्याकडे मागणी

- Advertisement -

औरंगाबाद – मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. ग्रामीण भागात रस्ते खचले, पूल वाहून गेले. पाझर तलाव फुटले आहेत. औरंगाबद जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करत, हेक्टरी सरसकट ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी, या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बुधवारी (ता.६) पत्रकार परिषदेत दिली. डॉ. कराड म्हणाले की, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळ अतिवृष्टी झाली आहे. यात जिल्ह्यात दौरा केला. यात कन्नड, वैजापूर येथे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते खचले. पुल वाहून गेला. बंधारे, पाझर तलाव फुटले. जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात १७ जण दगावले आहेत.

शेतकरी मदतीस उशीर झाला, तर रब्बी हंगामावर परिणाम होईल. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत. सरसकट मदत मिळावी. अशी भाजपची मागणी आहे. पिण्याचे पाण्याची ८२९ योजनांपैकी केवळ ३४ योजना नादुरुस्त झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी विशेष पॅकेज मिळावे, ही मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशी मदत केली तशी मदत विभागात करावीत अशी मागणी करणार असल्याचेही डॉ. कराड म्हणाले.

- Advertisement -

पीकविमा कंपन्यांची अनेक तक्रारी आल्या आहेत. याच संदर्भात आम्ही राज्य सरकारकडे बोलणार आहे. पीकविमा कंपन्यासाठीचा राज्य सरकारने त्यांचा हिस्सा दिला नसल्याचा आरोपही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी केला. या बाबातही आकडेवारी घेत राज्य सरकारशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस आमदार अतुल सावे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जालिंदर शेंडगे, संजय खंबायते आदी उपस्थित होते.