दहिवडी | माण पंचायत समितीच्या सभापतिपदी बिदाल गणाच्या पंचायत समिती सदस्या अपर्णा भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापतिपदाच्या रिक्त जागेसाठी प्रातांधिकारी शैलेश सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
माण पंचायत समितीमध्ये रासप, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांच्या आठ सदस्यांनी एकत्र येऊन शिवसेनेचे नेते शेखर गोरे गटाच्या कविता जगदाळे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर केला. त्यानंतर दि. 25 मे रोजी लतिका वीरकर यांना सभापतीपदी संधी मिळाली होती. त्यांनी ठरल्याप्रमाणे दि. 5 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. माण पंचायत समितीच्या सभापती लतिका विरकर यांनी राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या जागी उपसभापती नितीन राजगे यांनी कार्यभार सांभाळला. मंगळवारी झालेल्या सभापती निवडीत अपर्णा सोमनाथ भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सभापतिपदी निवड झाल्याबद्दल अपर्णा भोसले यांचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, बाजार समिती सभापती विलासराव देशमुख, अतुल जाधव आदींनी अभिनंदन केले. निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला.