पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल येऊन आता जवळपास दीड वर्ष झाले. मात्र, उत्तीर्ण झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही. याकारणास्तव अधिकारीपदी निवड झालेल्या उमेदवार पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे उद्यापासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
एप्रिल २०१७ मध्ये पूर्व व मुख्य परीक्षा झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल मे २०१८ मध्ये जाहिर करण्यात आला. सदर निकालावर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे न्यायालयीन निर्णय प्रक्रियेमुळे या उमेदवारांचे प्रशिक्षण व नियुक्ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारांच्या प्रशिक्षण व नियुक्ती देण्याबाबत राज्य शासन न्यायालयाच्या निर्णयासाठी थांबले होते व न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेच नियुक्ती देऊ असे उमेदवारांना सांगण्यात आले होते. मात्र, मागील महिन्यात न्यायालयाने याबाबत निर्णय जाहीर करुन देखील आता महिना उलटून गेला. परंतु, अजूनही उमेदवार नियुक्तीच्याच प्रतीक्षेत आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांनी उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर देखील अशी नियुक्ती साठी लढा देण्याची वेळ येवू नये म्हणून आमच्या सोबत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. “उद्या निवड होवून देखील वर्षभर बेरोजगार राहण्यापेक्षा एक दिवस यांच्या प्रयत्नांना साथ देवूया…या अधिकाऱ्यांचा आवाज होवूया. परिवर्तन होणारच…” असे आवाहन या भावी अधिऱ्यांकडून करण्यात आले आहे.
एकीकडे शासन तरुणांचा प्रशासनात सहभाग वाढावा म्हणून मुख्यमंत्री फेलोशिप व अन्य अभियान राबवित आहे. तरुणांना प्रशासनात सामावून घेण्यासाठी विविध अभियान व अन्य कंत्राटी मार्गाने संधी देवून शासन प्रशासकीय व्यवस्था गतिमान करण्याचे स्वप्न बघत आहे व अनेक नविन्यपूर्ण योजना व उपक्रम या तरुणांच्या कल्पनाशक्तीद्वारे राबवून घेते. मात्र दुसरीकडे हे निवड झालेले अधिकारी तरुण मूलं प्रचंड स्पर्धा असलेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तिन्ही टप्प्यांमधून यशस्वी झालेत. परंतु या तरुण अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत नियुक्ती नाही.
गेल्या वर्षभरापासून हे उमेदवार ट्विटर व अन्य सोशल माध्यमातून आपल्या भावना ह्या सरकार दरबारी मांडत आहेत. मात्र सरकार दरबारी याची दखल घेतलेली दिसत नाही. काही उमेदवारांनी याबाबत आपल्या भावना समाज माध्यमांवर पुढील प्रमाणे व्यक्त केल्या आहेत.
“आधी पास होण्यासाठी कष्ट आणि नंतर नियुक्तीसाठी साठीही. या चक्रातून लवकर बाहेर काढा. कृपया आमचा हा 14 महिनाच्या वनवास लवकरच संपवा.”
“माननीय मुख्यमंत्री महोदय, राज्यसेवा परीक्षेचा निकाल येऊन दीड वर्ष झाले तरीही आम्हाला नियुक्त्या नाहीत… ५ ते ६ वर्षे मेहनत घेऊन पोस्ट मिळाली, पण अजून प्रशिक्षण सुरू झालं नाही. आमची चूक तरी काय? आम्हाला न्याय कधी मिळणार? कृपया तातडीने यात लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती.”
तर अन्य उमेदवारांने मंगेश पडगांवकर यांच्या ‘सांगा कसे जगायचे’ या कवितेच्या माध्यमातून सरकारकडे लवकर नियुक्ती मिळावी म्हणून विनंती केली आहे.
” सांगा कसे जगायच..?
निवड झाली म्हणून आनंदात जगायचे की
नियुक्ती नाही म्हणून कुणा कुणाला उत्तर द्यायचे..?
बेरोजगार आहे म्हणून सांगायचे की राजपत्रित अधिकारी आहे म्हणून सांगायचे..?
सांगा कसे जगायचे..??”
निवड झालेले अधिकारी नियुक्ती साठी रस्त्यांवर उतरण्यापेक्षा शासनाने आता ‘देर आये दुरुस्त आये’ या प्रमाणे दीड वर्षांचा वनवास सहन केलेल्या उमेदवारांना लगेच नियुक्ती देवून हा प्रश्न मार्गी लावावा.