हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध समाजातील बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर (Mini Tracker) आणि त्याच्या उपसाधनांवर 90 टक्के अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नांदेड (Nanded) जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे.
योजनेचे स्वरूप आणि आर्थिक मदत
राज्य शासनाच्या 2017 च्या शासन निर्णयानुसार, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान एकूण 3.50 लाख रुपयांच्या प्रकल्प खर्चावर 90 टक्के म्हणजेच 3.15 लाख रूपये असे असेल. या योजनेत बचत गटांना फक्त 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
अर्जबाबत अटी आणि प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार बचत गटांमध्ये किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे. तसेच, गटाचे अध्यक्ष आणि सचिव हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असायला हवेत. अर्जदार बचत गट महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी इच्छुक बचत गटांनी www.mini.mahasamajkalyan.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. हा अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची प्रिंट समाज कल्याण कार्यालयात जमा करावी.
निवड प्रक्रिया
या योजनेच्या अनुदानासाठी अर्ज केलेल्या बचत गटांची निवड काही अटी आणि शर्तींना लागून केली जाणार आहे. जर अर्ज संख्येने अधिक असतील, तर निवड प्रक्रिया लॉटरी पद्धतीने घेतली जाईल. त्यामुळे अर्जदारांनी सर्व अटींची पूर्तता करून अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत.