फलटण | फलटण तालुक्यातील सरडे येथील तिरंदाज प्रवीण जाधव या खेळाडूने टोकियो येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये मेडल मिळविण्यासाठी प्रयत्न केलेले होते. परंतु थोड्या फरकाने अपयश आले. प्रविणच्या या कामगिरीचा फलटण तालुक्यातील जनतेला सार्थ अभिमान आहे. आगामी काळामध्ये होणाऱ्या ऑलम्पिक व इतर खेळासाठी प्रवीण जाधवला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण येथील विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ” लक्ष्मी – विलास पॅलेस ” या निवासस्थानी प्रवीण जाधव यांचा यथोचित सत्कार आयोजित करण्यात आलेला होता. त्या वेळी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, विकास भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण येथे प्रशिक्षण केंद्र व प्रशिक्षक उपलब्ध करणार : ना. रामराजे निंबाळकर
फलटण तालुका व सातारा जिल्ह्याच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जाहीर सत्कार करण्याचे नियोजन करणार आहे. फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी व खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी प्रवीण जाधव यांचा सत्कार व सन्मान आगामी काळामध्ये करण्यात येणार आहे. फलटण तालुक्यामध्ये मुले व मुलींचे हॉकी, कबड्डी या खेळांसह विविध खेळांमध्ये उत्कृष्ठ प्रशिक्षण मिळण्यासाठी फलटण येथे प्रशिक्षण केंद्र व उत्कृष्ठ दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देणार आहे, असेही ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी स्पष्ट केले.