Wednesday, October 5, 2022

Buy now

आर्किटेक्टला बेदम मारहाण; पं.स. सदस्यासह 10 जणांवर गुन्हा

कराड प्रतिनिधी । सकलेम मुलाणी

आर्थिक कारणावरुन आर्किटेक्टसह अन्य दोघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पंचायत समिती सदस्यासह सुमारे दहाजणांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत आर्किटेक्ट जितेंद्र पारसमल भंडारी (रा. कोयना कॉलनी, शनिवार पेठ, कराड ) यांनी फिर्याद दिली आहे.

पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, मुकूंद पाटील, बाळासाहेब पाटील, राजू (सर्व रा. वारुंजी, ता. कºहाड) यांच्यासह अन्य सहाजणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोयना कॉलनीत राहणारे जितेंद्र भंडारी हे आर्किटेक्ट असून त्यांची पार्श्व आर्किटेक्ट नावाची फर्म आहे. या फर्मच्या माध्यमातून ते इमारतींची कामे घेतात. २०१०-११ साली एका इमारतीचे काम सुरू असताना त्यांची नामदेव पाटील यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी नामदेव पाटील यांच्या सुमारे दहा ते बारा प्रोजेक्टवर काम केले. तसेच त्यांच्या गावातील ‘कुसुमावली वाडा’ या घराचे कामही भंडारी यांनी केले.

२०१८ साली सत्यजित ग्रुपतर्फे हॉटेल, मॉलसह अपार्टमेंटचे काम करायचे असल्यामुळे सत्यजित ग्रुप आणि भंडारी यांच्या पार्श्व आर्किटेक्टमध्ये करार झाला. तसेच कामही सुरू झाले. मात्र, २०२० मध्ये हे काम बाळासाहेब पाटील यांचा मुलगा नयन यांच्यामार्फत केले जाणार असल्याचे सत्यजित ग्रुपकडून सांगण्यात आले. तसेच संबंधितांनी तुमचे कसलेही पैसे आम्ही देणे लागत नाही, असे भंडारी यांना ई मेलद्वारे कळविले. १६ लाख २५ हजार रुपये येणे बाकी असल्यामुळे भंडारी यांनी याबाबत संबंधितांना नोटीस पाठविली. मात्र, त्यांनी ती स्विकारली नाही.

दरम्यान, याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न गत काही दिवसांपासून सुरू होता. बुधवारी, दि. १७ या व्यवहाराबाबत मध्यस्थी करण्यासाठी वारुंजी फाट्यावर सत्यजित पतसंस्थेच्या कार्यालयात बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी जितेंद्र भंडारी, त्यांचा भाऊ संजय व मित्र नितीन छाजेड हे तिघेजण सत्यजित पतसंस्थेत गेले. बैठक सुरू असताना संजय भंडारी यांनी नामदेव पाटील यांना तुम्ही आम्हाला दहा लाख रुपये दिले असल्याचे सांगीतले. मात्र, तेरा लाख रुपये दिले आहेत, असे म्हणून नामदेव पाटील यांच्यासह इतरांनी जितेंद्र भंडारी, संजय भंडारी व नितीन छाजेड यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी खुर्च्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या जितेंद्र भंडारी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद कºहाड शहर पोलिसात झाली आहे.