अर्जुन खोतकरांचा 250 कोटींचा घोटाळा – किरीट सोमय्या

जालना – शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी साखर कारखाना आणि बाजार समितीच्या माध्यमातून नियमबाह्य कामे करून गैरव्यवहार केला आहे. त्यात जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन आणि अन्य सरकारी जमिनीचे मूल्य कमी दाखवून हा जवळपास 250 कोटींचा घोटाळा खोतकरांनी केला असून, त्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी सुरू असल्याचेही माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. सोमय्या हे काल जालना दौऱ्यावर आले होते. सकाळी त्यांनी जालना येथील रजिस्ट्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच बाजार समितीच्या अर्जुन खोतकर व्यापारी संकुल आणि जालना तालुक्यातील रामनगर येथील साखर कारखान्यास भेट दिली. तेथे त्यांनी अधिकारी तसेच शेतकरी, मजुरांशी चर्चा केली. या भेटीनंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत अर्जुन खोतकर यांनी जालना साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जरंडेश्वरच्या धर्तीवर गैरव्यवहार झाल्याचे सांगितले.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, 2010 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना राज्यातील 29 साखर कारखाने कर्जाचे कारण दाखवून विक्रीस काढले होते. त्यावेळी या कारखान्याची किंमत 47 कोटी रुपये काढण्यात आली होती, परंतु औरंगाबादेतील दोन उद्योजकांच्या मदतीने अर्जुन खोतकर यांनी हा कारखाना ‘अर्जुन शुगर इंडस्ट्रीज’ स्थापन करून घेतला. त्यावेळी त्याचे मूल्य कमी दर्शविण्यात आले. तसेच या कारखान्याची शंभर एकर जमीन आणि आणखी शंभर एकर जमीन ही हडप करण्याच्या दृष्टीने त्यांनी त्या जमिनीचे मूल्यदेखील कमी दर्शविल्याचे सोमय्या म्हणाले. विशेष म्हणजे या सर्व २९ साखर कारखाना विक्रीची चौकशी ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात सुरू झाली होती, याची आठवणही सोमय्या यांनी करून दिली.

दरम्यान, ही चौकशी सुरू असताना नंतर राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे आले, त्यांनी या चौकशीला पाहिजे तशी गती न देता ती लालफितीत टाकली होती. त्याच दरम्यान कारखान्याचे सभासद शेतकरी आपल्याकडे आले होते. त्यामुळे आपण यात पुढाकार घेऊन ही सर्व कागदपत्रे ईडीकडे दिल्याचे ते म्हणाले. राज्यातील पोलिसांकडून पाहिजे त्या गंभीरतेने ही चौकशी न झाल्यानेच ही चौकशी केंद्रीय यंत्रणांकडून केली जात असल्याचे ते म्हणाले. राज्यातील पोलीस दलावरही सोमय्या यांनी टीका केली. तसेच ज्या राज्याचे गृहमंत्रीच आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याचे सांगून पोलीस आयुक्तावर खंडणीचे गुन्हे असल्याचे ते म्हणाले. सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने सेवेत पुन्हा रुजू करून घेतल्यानंतर त्यांनी काय प्रताप केला, हे जनतेसमोर असल्याचे ते म्हणाले.

You might also like