भिवंडीत सशस्त्र दरोडा; कुटुंबावर हल्ला करून लाखोंचे दागिने पळवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भिवंडी शहराला लागून असलेल्या खोणी या गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर सशस्त्र 5 दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. या दरोडेखोरांनी घरातील एका खोलीत झोपलेल्या वयस्क महिलेच्या गळ्यावर सूरा ठेवून तिच्या अंगावरील दागिने घेऊन पलायन केले आहे. भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी गावात अ‍ॅड अजय पाटील यांच्या घरात हा दरोडा पडला आहे.

घटनेच्या दिवशी अजय पाटील यांचे कुटुंबीय झोपले असताना मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. अजय विष्णू पाटील हे आपल्या पत्नी मुला सह एका खोलीत तर त्यांची आई नंदा आणि सहा वर्षांची मुलगी हे दुसऱ्या खोलीत झोपले होते. रात्री अडीच वाजताच्या सुमारास आलेल्या दरोडेखोरांनी प्रथम अजय पाटील यांच्या कार्यालयाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला. मात्र त्या ठिकाणी काहीच न मिळाल्याने या दरोडेखोरांनी आपला मोर्चा पहिल्या मजल्यावरील घराकडे वळवला.

यानंतर त्यांनी अजय पाटील यांची आई नंदा झोपलेल्या खोलीत ते शिरले आणि त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवत कानातील कर्णफुले खेचून काढली. यानंतर गळ्यातील गंठन आणि हातातील बांगड्या हिसकावून घेत असताना नंदा यांनी मला मारू नका तुम्हाला काय न्यायचे ते न्या अशी विनंती केली. यादरम्यान नंदा यांची सून अचानक जागी झाली. घरात काही व्यक्ती आल्याचे पाहून तिने जोरजोरात आरडाओरड केल्याने दरोडेखोरांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला. यावेळी काही लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी आपल्यासोबत रस्सीने बांधून आणलेले दगड ग्रामस्थांवर भिरकावले आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. यानंतर पीडित कुटुंबाने स्थानिक निजामपुरा पोलिसांना घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment