सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यात २४ मार्चपासू सर्वत्र लाॅकडाउन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्वत्र कडेकोट नाकाबंदी आहे. मात्र तरिही अनेकजण आडमार्गाने जिल्हाबंदी तोडून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी, नाकाबंदी असतानाही कराडमध्ये तब्बल साडेसहाशे नागरीक शहरात आले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे कराडकरांसाठी या परराज्यांतून तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या लोकांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.
११ एप्रिलनंतर सुमारे २२ नागरिक कराडमध्ये आले आहेत.तामिळनाडू, ओरिसा, चेन्नईसह राज्यातील पुणे-मुंबई, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यातून लोक जिल्हाबंदी मोडून घरी आले आहेत. मालगाडीतून तसेच मिळेल त्या वाहनाने, तर काही जण पायी चालत प्रवास करत घरी आले आहेत. प्रवाशांनी नाकाबंदीपुर्वीच वाहनांतून उतरून शेतातूनही पायी प्रवास केला आहे. नाकाबंदीचे ठिकाण ओलांडून पुन्हा तेच अत्यावश्यक सेवेचे वाहन काही अंतरावर पकडून पुन्हा त्यांनी पुढचा प्रवास केला आहे. यातील काहीजणांनी आपली माहिती प्रशासनापासून लपवून ठेवली होती. मात्र, शेजार पाजार्यांनी प्रशासनाला कल्पना दिल्यानंतर त्यांचे बिंग फुटले. आता अशांची तपासणी करुन त्यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.
एवढ्यावर हे थांबणे अपेक्षित होते. मात्र, ‘होम क्वारंटाईन’ केलेले अनेकजण रस्त्यावर फिरतानाही आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना आढळून आले आहेत. त्याबाबत त्यांना समज देताना संबंधितांकडून कर्मचार्यांनाच दमदाटी झाल्याचा प्रकारही घडला आहे. वास्तविक, संचारबंदीत रस्त्यावर येणाऱ्या स्थानिक नागरीकांवर पोलीस तातडीने कारवाई करतात. मात्र, जिल्हाबंदी असतानाही परजिल्ह्यातून आलेल्या लोकांवर अपवाद वगळता कारवाई का झालेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लॉकडाऊन असतानाही परजिल्ह्यातून कराडात आलेल्यांवर कारवाई का झालेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधितांबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.