फक्त ‘या’ कारणामुळं हॉटेल ताज पॅलेसची तब्बल 8 कोटी 85 लाखांची थकबाकी BMCने केली माफ

मुंबई । मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील ताज पॅलेस हॉटेलच्या (Hotel Taj Palace) सुरक्षेसाठी या परिसरातील रस्ता आणि पदपथावर अडथळे उभारण्यात आले आहेत. रस्ते अडवल्याबद्दलच्या महापालिकेच्या शुल्कात 50 टक्के कपात आणि पदपथाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (Bmc) घेतला. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला.

26 नोव्हेंबर 2008मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये दहशतवादी शिरले होते. या हॉटेलमध्ये नेहमीच देशातील परदेशातील पर्यटकांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा वावर असतो. त्यामुळे हल्ल्यानंतर हॉटेलच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या निर्देशानुसार सभोवतालच्या रस्त्याच्या काही भागात अडथळे म्हणून झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. तसेच पदपथही बंद करण्यात आला. पी. जे. रामचंदानी मार्ग, बेस्ट मार्ग, बी. के. बोमन बेहराम मार्ग आणि महाकवी भूषण मार्ग हे रस्ते येतात. या रस्त्याच्या काही भागात कुंड्या ठेवून 869 चौरस मीटरची जागा अडविण्यात आली. त्यामुळे 9 जून 2015 मध्ये अडवलेल्या रस्त्यांबाबत पालिकेकडे तक्रार आल्यानंतर या हॉटेलकडून दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

रस्त्यांचे आणि पदपथांचे आवश्‍यक शुल्क वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. तशी नोटिसही हॉटेल व्यवस्थापनाला पाठविण्यात आली. मात्र, या जागेचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात नसून नागरिकांच्या सुरक्षेसाठी केला जात आहे. पोलिसांच्या सुरक्षेनुसार हे उपाय करण्यात आले आहेत. त्यामुळे या शुल्कात 50 टक्के सवलत मिळावी, अशी विनंती हॉटेल व्यवस्थापनाने पालिकेकडे केली. त्यानुसार रस्ते वापराच्या शुल्कापैकी 50 टक्के आणि पदपथाचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. काँग्रेसने याला विरोध केला आहे. (Arrears Of Rs. 8 Crore 85 Lakhs Of Hotel Taj Palace Have Been Forgiven By The Mumbai Bmc)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’