जळगाव । २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर हुसेन राणाला झालेली अटक हा भारताचा विजय असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. तहव्वूर राणा याला अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. त्याला आता भारतात आणण्याची प्रकिया सुरू आहे. यावर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा खटला सरकार पक्षाकडून लढणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
उज्वल निकम म्हणाले की, २६/११ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात राणाचा सहभाग होता. राणा आणि मिस्टर सेंडस हे शिकागो येथे एमिग्रेट लॉ सेंटर चालवत होते. राणाने डेव्हिड हेडलीच्या मदतीने मुंबईत एमिग्रेट लॉ सेंटरचे ऑफिस उघडले होते. त्या निमित्ताने डेव्हिड हेडली हल्ला करण्याच्या आधी मुंबईत आला. मुंबईत ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करायचा आहे, त्या ठिकाणांचे त्याने फोटो काढले. ते फोटो घेऊन तो शिकागोला गेला. त्यानंतर त्याने ते फोटोग्राफ्स लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर्सना दिले. अशी खळबळजनक साक्ष डेव्हिड हेडलीने मुंबईच्या न्यायालयात दिली आहे. या कामासाठी मला राणा पैसे पुरवत होता, असेही हेडलीने आपल्या साक्षीत सांगितले असल्याचे निकम म्हणाले.
दरम्यान, डेव्हिड हेडली मुंबईच्या दहशतवादी कटात सहभागी असल्याने त्याला शिकागोच्या न्यायालयाने ३५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आम्ही हेडलीची मुंबई न्यायालयात साक्ष घेतली; जेणेकरून पाकिस्तान दहशतवादी हाफिज सईद, जकी उर रहमान यांच्याविरुद्ध कारवाई करेल. परंतु, तरी देखील पाकिस्तानने त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही, असेही उज्ज्वल निकम यावेळी म्हणाले. तहव्वूर हुसेन राणा याच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयाने एक अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्या वॉरंटची बजावणी राणाला झालेली आहे. आता त्याच्याविरुद्ध गुन्हेगार हस्तांतर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. त्याच्याविरुद्ध भारताकडे भरभक्कम पुरावे असल्याने त्याच्यावर निश्चित कारवाई होईल, असा विश्वास देखील उज्ज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”