बंडातात्या कराडकरांना अटक केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; विलासबाबा जवळ यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 20 जुलै रोजी यंदाची आषाढी एकादशी आहे. पंढरपूर येथे यंदा आषाढी वारीसंदर्भात प्रशासनाने काही नियमावली जारी केली आहे. काही मोजक्या वारकरी भाविकांना पंढरपुरात वारीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यावरून व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र संघटनेचे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने 500 वारकरी यांच्या मर्यादेवर पायी वारीचा निर्णय घेऊन परवानगी द्यावी. पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना आणि बंडातात्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जवळ यांनी बुधवारी दिला आहे.

आषाढी वारीच्या पायी वारीसाठी 2 जुलै रोजी वारकऱ्यांनी आळंदीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कऱ्हाडकर यांनी नुकतेच केले हाेते. त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांना नोटीसदेण्याचा प्रयत्न केला असता ते आढळून आले नाहीत. त्यावरून सोशल मीडियात उलट सुलट चर्चा सुरु होत्या. याबाबत व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र संघटनेचे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी बुधवारी खुला केला. ते म्हणाले कि, बंडातात्या कराडकर हे गायब झाले नसून ते पाटणच्या वाल्मिकी पठार येथे एकांतात आहेत.

प्रवक्ते जवळ यांनी सरकारला काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये ते म्हणतात की, एकाबाजूला कोरोनाचे नियम पायदळी तुडवून राजकीय मेळावे, सभा घेतले जात आहेत. मग वारकऱ्यांच्या पायी वारीच्या श्रद्धेवर घाला का? सरकारने 500 च्या मर्यादेवर पायी वारीचा निर्णय घेऊन परवानगी द्यायला हवी. पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना आणि तात्यांना अटकाव करून अटक करण्याचा प्रयत्न केल्यास याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा जवळ यांनी दिला आहे.