खटाव | खटाव तालुक्यात वाढत्या गुलाबी थंडीबरोबर परदेशी पाहुण्या गुलाबी फ्लेमिंगोचे (रोहीत) येरळवाडी (ता.खटाव) येथे सुमारे 28 ते 29 फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. थंडीत दाखल झालेल्या परदेशी पाहुण्यांमुळे पक्षीमित्रांच्या आनंदाला उधाण आले आहे. तर येथील तलावात बार हेडेड गुज, गोल्डन डक यासह स्थानिक पक्षांचाही किलबिलाट वाढला आहे.
खटाव तालुक्यात येरळवाडी, मायणी, कानकात्रे व सुर्याचीवाडी तलाव हे रोहीत पक्षांचे थंडीत वास्तव्यात येतात. यातील सुर्याचीवाडीत यावर्षी पाणीसाठा न झाल्याने येरळवाडीत फ्लेमिंगोने हजेरी लावली आहे. पेरू, चिली, मंगोलीया, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडिज रांगांत तर भारतात कच्छच्या रणात फ्मेमिंगो मोठ्या प्रमाणात आढळतात.
या भागात पडणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हे पक्षी दुष्काळी तालुक्यातील मायणी, येरळवाडी व कानकात्रे येथे हजेरी लावतात. त्यांचे निरिक्षण करण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, कराड आदी ठिकाणांसह स्थानिक भागातून पक्षीमित्र तलावावर दाखल होतात. सद्या वडूजपासून 7 ते 8 किलोमिटर अंतरावर असणाऱ्या येरळवाडी तलावात सुमारे 28 ते 29 फ्लेमिंगो दाखल झाले आहेत. दरवर्षी हे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हे पक्षी खटाव -माणच्या तलावावर दाखल होतात.