खटाव | मायणी पक्षी संवर्धन राखीव मधील येरळवाडी तालुका खटाव येथे गुलाबी थंडीत परदेशी पाहुण्यांचे म्हणजेच फ्लेमिंगो रोहित पक्षांचे आगमन झाले आहे. या पाहुण्या पक्ष्यांना पाहण्यासाठी जिल्ह्यातील पक्षी प्रेमींचे पाय येरळवाडी तलावाकडे वळू लागली आहेत. उंच पाय, इंग्रजीतील एस आकारासारखी मान, गुलाबी पंखी पक्ष्यांमुळे तलाव परिसर बहरून गेला आहे. येरळवाडी मध्यम प्रकल्पात अनेक स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. यामध्ये सुमारे 25 ते 30 फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा विराजमान झाला आहे.
सध्या तलाव चित्रबलाक, करकोचा, कांडेसर, स्पून बिल, काळा शराटी, पान कावळा, खंड्या, कवड्या, कवड्या तुतारी, शेकाट्या, जांभळी पाणकोंबडी, चक्रवाक, नदीसुरय, सुतारपक्षी, ग्रे हेरॉन, चांदवा, कोतवाल आदी पाहुण्यांनी बहरला आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणांहून पक्षीप्रेमी तलाव परिसरात दाखल होत आहेत.
दरम्यान, दरवर्षी डिसेंबर महिना अखेर येरळवाडी तलावात फ्लेमिंगो पक्षी येत असतात. त्यांच्या निरीक्षणासाठी पक्षीप्रेमीही हजेरी लावतात. सध्या फ्लेमिंगो पक्षी नोव्हेंबरमध्येच आल्याने पक्षी प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खटाव तालुक्यात वाढत्या गुलाबी थंडीच्या आगमनाबरोबरीने रंगाने गुलाबी असणार्या फ्लेमिंगोच्या आगमनाने पक्षीमित्रांची येरळवाडी तलावाकडे वर्दळ वाढली आहे.