सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज मंगळवारी दि. 28 रोजी सातारा जिल्ह्यात आगमन झाले. निरा नदीच्या पात्रात दत्त घाटावर श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यावेळी वारकऱ्यांनी माऊली माऊली’च्या गजरात मोठ्या भक्तिभावाने पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे सहा मुक्काम होणार असून माऊलींच्या स्वागताची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. माऊलीच्या स्वागतापूर्वी निरा नदीपात्रात पाडेगाव बाजू तीरावर दत्त घाटावर पादुकांना स्नान घालण्यात आले. निरा स्नानासाठी वीर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. माऊलींचा पालखी सोहळा नीरा नदीच्या जुन्या पुलावरून सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल.
नीरा नदीच्या पाडेगाव तीरावर माऊलींचा रथ थांबल्यावर माउलींच्या पादुकांना नीरा नदीत ‘नीरा स्नान’ घालण्यासाठी नेण्यात आली.
शासनामार्फत तीर्थक्षेत्र आराखड्यातून दत्त घाटाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. माऊलींना निरास्नान घालण्यासाठी नेण्यात येत असताना भाविकांची मोठी गर्दी होते.. या ठिकाणी गर्दी गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.