Kejriwal On Ram Mandir : राम मंदिर ही अभिमानाची गोष्ट, रामराज्यातून प्रेरणा घेऊनच दिल्लीत काम केलं- केजरीवाल

Kejriwal On Ram Mandir
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kejriwal On Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir Ayodhya) ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रामराज्यातून प्रेरणा घेऊनच आम्ही दिल्लीत काम केलं असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रभू श्रीरामांनी आपल्याला काय काय शिकवलं हे सुद्धा सांगितलं आहे. छत्रसाल स्टेडियमवर आयोजित दिल्ली सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केजरीवाल बोलत होते.

अरविंद केजरीवाल म्हणाले, २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. संपूर्ण देशवासीयांनी हा उत्सव साजरा केला. संपूर्ण जगासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. प्रभू श्रीरामांनी आपल्याला जे काही शिकवलं आहे त्या सर्व गोष्टी आपण आपल्या जीवनात आचरणात आणल्या पाहिजेत. केजरीवाल यांनी यावेळी रामायणातील काही कथेचा संदर्भ सुद्धा दिला. भगवान रामाचा राज्याभिषेक दुसऱ्या दिवशी सकाळी होणार होता. अयोध्येत तयारी पूर्ण झाली होती, प्रभू राम अयोध्येचा राजा होणार याचा अयोध्येतील लोकांना आनंद सुद्धा होता. मात्र अचानक संध्याकाळी प्रभू रामांना संदेश येतो की राजा दशरथ त्यांना बोलावत आहेत. श्रीराम खोलीत जातात आणि पाहतात तर दशरथ राजा खूप दुखी असतात.

केजरीवाल पुढे सांगतात, कैकयीने दशरत राजाला दोन अटी घातल्या, एक म्हणजे प्रभू रामाला 14 वर्षे वनवास भोगायला लावणे आणि दुसरी म्हणजे भरतला अयोध्येचा राजा बनवावे . प्रभू रामाने दशरथाला सांगितले की, आपले वचन पाळले जाईल. तेव्हा कोणत्याही दुःखाशिवाय, चेहऱ्यावर हास्य घेऊन प्रभू रामांनी 14 वर्षांचा वनवास भोगला. हे आपल्याला शिकवते की आपण त्याग करण्यापासून मागे हटू नये. भरत आणि राम सिंहासनासाठी लढले नाहीत. पण आजच्या काळात दोन भाऊ राम नामाचा जप करतात आणि जमिनीसाठी लढतात .

केजरीवाल म्हणाले, रामराज्यातून प्रेरणा घेऊनच दिल्लीत काम केलं. रामाच्या काळात सर्व मुलांना गुरुकुलात शिक्षण मिळाले, राजा, भिकारी, शेतकऱ्याचा मुलगा हे सर्व सगळे गुरुकुलात गेले. सर्वांना समान शिक्षण मिळाले. पण आज आपल्या देशात श्रीमंतांची मुलं खाजगी शाळेत जातात आणि गरिबांची मुलं सरकारी शाळेत जातात. पण आम्ही 9 वर्षात दिल्लीत ही प्रथा बदलली आहे. समान शिक्षण मिळू लागले आहे असं म्हणत केजरीवाल यांनी एकप्रकारे भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.