भटिंडा (पंजाब) | आम आदमी पार्टीच्या पंजाब युनिट मध्ये सध्या बेकीचे वातावरण असून उद्या पक्षाचे प्रमुख नेते सुखपाल खैरा यांनी आपल्या समर्थकांची भटींडा येथे बैठक बोलावली आहे. सुखपाल खैरा यांना मागील काही दिवसात पक्षाने विरोधी पक्ष नेते पदावरून हटवून तेथे जातीने दलित असलेल्या हरपाल सीमा यांची नेमणूक केली होती. सीमा यांच्या नेमणुकी पासून पक्षात नाराजीचा सूर उमटत चालला आहे. पक्षाला जर दलित चेहरा पुढे करायचा आहे तर पंजाब चा प्रदेशाध्यक्ष दलित का नेमला जात नाही असा सवाल सुखपाल खैरा यांनी पक्ष नेतृत्वाला केला आहे.
दरम्यान पंजाब प्रभारी असलेले मनीष सिसोदिया यांनी भटींडामध्ये होणाऱ्या रॅलीला पक्ष विरोधी कृती म्हणले असून बंडखोरांना योग्य धडा शिकवण्यात येईल असे म्हणले आहे. सिसोदिया यांचे हे वक्तव्य म्हणजे एकाधिकारशाहीचे उत्तम उदाहरण असल्याचे सुखपाल खैरा यांनी सोशल मीडियाचा आधार घेत म्हणले आहे.
पंजाब युनिट मध्ये उधळलेली बंड खोरी पक्षासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जाते आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल पंजाबचा दौरा आखत असल्याचे बोलले जात आहे. सुखपाल खैरायांच्या सोबत पार्टीचे सात ते आठ आमदार असल्याने त्यांना पक्षांतर बंदीच्या कायद्याला सामोरे जावे लागण्याचा संभव आहे.