विशेष प्रतिनिधी : राज्यातील भाजप-सेना यांच्यातील वादाचे पडसाद आता दिल्लीत पाहायला मिळाले. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे, असे ट्विट अरविंद सावंत यांनी केले होते. त्यांनतर सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडणार हे स्पष्ट झाले आहे.
सध्या भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना आज सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला राज्यपालांना कळवावे लागणार आहे. सत्तेत मुख्यमंत्रिपदाचे मानाचे पान मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेसमोरची राजकीय आव्हाने वाढली आहेत.
केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा…. मी एक #शिवसैनिक
Resignation from the Union Cabinet pic.twitter.com/ruecZkOIBD— Arvind Sawant (@AGSawant) November 11, 2019
भाजपने शिवसेना सोबत नसेल, तर सत्तास्थापन करण्यास असमर्थता व्यक्त करीत धक्कातंत्रांचा वापर करीत शिवसेनेला सत्ता स्थापण्यासाठी ‘खो’ दिला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १०५ जागा निवडून आल्याने शिवसेनेने ५६ जागांच्या बळावर भाजपकडे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद मागितले. पण, त्यासाठी भाजप तयार तर झाला नाहीच; पण शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्नही भाजपने केला नाही. भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करेल आणि त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेशिवाय पर्याय नसेल, असा शिवसेनेचा कयास होता. मात्र, तो पूर्णपणे फोल ठरला. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून भाजपवर दबाव वाढविण्याचाही प्रयत्न शिवसेनेकडून होत होता. मात्र, शिवसेनेची ही सगळीच गणिते फिस्कटल्याने शिवसेनेची आव्हाने वाढली आहेत