कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनास राज्यातील नागरिक प्रतिसाद देताना दिसत आहेत. ज्यावेळेस महाराष्ट्रावर संकट येते, त्यावेळी राज्यातील तरूणाई मदतीसाठी पुढे सरसावली असल्याचे पहायला मिळाले आहे. कोरोनाच्या संकट काळात राज्य शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे नागरिकांनी पालन करावे. म्हणजे कोरोनाचा आजार आटोक्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कराड तालुक्यातील कोळे येथे ग्रामपंचायत सदस्य लतिफा फकीर यांचा नातू व सुलतान फकीर यांचे चिरंजीव अबरार फकीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोळे ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र (कोळे) यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, जि. प. सदस्य अॅड. उदयसिंह पाटील -उंडाळकर यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपसभापती रमेश देशमुख, सरपंच संगीता कराळे, उपसरपंच समाधान शिनगारे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सुनिता थोरात, डॉ.सुप्रिया बनकर, ग्रामविकास अधिकारी सतीश माने, पत्रकार गोरख तावरे, सचिन देशमुख, देवदास मुळे, अजीम इनामदार उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये युवा रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे विशेष खास बाब म्हणजे आशा सेविका रोहिणी देशमुख यांनी रक्तदान केले.