कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या चार महिन्यापासून थकलेले पगार तसेच लसीकरणाचा भत्ता मिळण्यासाठी कराड तालुक्यातील आशा स्वयसेविकांची पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांनी भेटून निवेदन दिले आहे. उद्या कराड तालुक्यातील 425 आशा स्वयंसेविका पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेणार आहेत.
आज कराड तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी आपल्या मागणीचे निवेदन सभापती प्रणव ताटे यांना दिले. राज्य सरकारने लवकरात लवकर आशा स्वयंसेविकांचा प्रश्न मार्गी लावण्यची मागणी करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यापासून पगार थकलेले आहेत. त्यातच कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढवलेला आहे, मात्र पगार दिले जात नाहीत.
पुढच्या पंधरा दिवसांवर दिवाळी सण येवून ठेपला आहे. तरीही पगार नाही, लसीकरणाचा भत्ता नाही त्यामुळे आशा स्वयंसेविका उद्या गुरूवारी दि. 14 रोजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटणार असून पगार व भत्ता या संदर्भात मागणी करणार आहेत.