सांगली (बावची) प्रतिनिधी | तूटपुंज्या मानधनावर गावाच्या आरोग्यासाठी दिवसभर पायपीट करणाऱ्या आशा सेविकेने कष्टाने व जिद्दीने आपल्या लेकीचे खाकी वर्दीचे स्वप्न साकारले आहे. बावची येथील आशा सेविका अलका वायचळ यांची मुलगी अश्विनी हिने पोलिस उपनिरिक्षक परीक्षेत यश संपादन केले. भूमिहीन कुटुंब, पदरी तीन मुली, एक मुलगा, पती बांधकाम कामगार. दररोज राबल्याशिवाय पर्याय नाही.
आशा सेविका म्हणून केवळ दीड दोन हजाराचे तूटपुंजे मानधन अशा प्रतिकूल परिस्थितीत आशा सेविका अलका यांनी जिद्दीने मुलीला शिक्षण दिले.अश्विनी हिनेही घरची परिस्थितीशी झगडत अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्र राज्यात ९२ वा क्रमांक मिळविला आहे. राज्यात क्लासेसचे मोठ्या प्रमाणात पेव सुटलेले असताना अश्विनीचं कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे.
अश्विनीने पालकांचे कष्ट सार्थ ठरवत कोणत्याही खासगी क्लासशिवाय घरी तयारी करून पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. तिचे हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे.
“घरच्या प्रतिकूल परिस्तिथीची जाणीव राखत जिद्दीने परिश्रम करून खाकी वर्दी मिळवण्याचे स्वप्न साकारले आहे. भविष्यात राज्यसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. माझ्या यशात आई, वडील व सर्व शिक्षकांच योगदान आहे.” अस म्हणाली