हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी आरोप केला आहे. “हि घटना केवळ महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे घडली आहे. या घटनेला महापालिका सर्वस्वी जबाबदार असून मुंबई महापालिका हि मुंबईतील लोकांच्या जीवाशी खेळ खेळात आहे,” असे शेलार यांनी म्हंटल आहे.
मुंबईतील चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून मदतकार्य केले जात आहे. तर विविध पक्षातील नेत्यांकडून या ठिकाणी भेटी दिल्या जात आहेत. या ठिकाणी आज भाजपनेते आशिष शेलार यांनी येऊन भेट दिली. तसेच दुर्घटनेतील लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी महापालिकेवर आरोपही केले. यावेळी शेलार म्हणाले की, अशा ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही. हि दुर्घटना घडल्यानंतर आता मुंबई महापालिकेकडून मदत केली जात आहे. हे घटना घडण्यापूर्वी या ठिकाणाहून स्थलांतर करण्याबाबत डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना महापालिकेने पूर्वसूचना दिली होती का?
अजूनही महापालिकेकडून मुंबईतील झोपडपट्टीबाबत तेथील पावसाळ्यात उध्दभवणाऱ्या समस्यांबाबत आढावा बैठक, पूर्वनियोजित बैठक घेण्यात आलेली नाही. मुंबईत विजेच्या गतीने यंत्रणा उभी करण्याची महापालिकेची क्षमता आहे. पालिकेकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता नाही. पण इच्छाशक्तीचा अभाव आहे. मुंबई महापालिका जनतेच्या जीवाशी खेळत आहे. एवढे बळी गेले. त्याला निष्काळजीपणा जबाबदार असून सामान्य माणसाला मात्र ते भोगावे लागत असल्याचे शेलार यांनी म्हंटले.