आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कुटुंबीयांसहित जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांना दोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमकी देण्यात आली आहे. सदर इसमाने अत्यंत अर्वाच्य भाषेत शेलार याना शिविगाळ केली असल्याची माहिती समोर आली आहे. आशिष शेलार यांना यापूर्वी देखील अशी धमकी देण्यात आली होती

आशिष शेलार यांना दोन दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. या पत्रात त्यांनी दोन्ही अज्ञात मोबाईल नंबरची माहिती देत तपास करण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी ते राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी करणार आहे.

आशिष शेलार याना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत या धमकीची मुंबई पोलिसांनी गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. आशिष शेलार हे महाविकास आघाडी सरकारविरोधात संघर्ष करत आहेत. आशिष शेलार लढवय्ये असल्यानं त्यांच्या विरोधात असे प्रकार सुरु आहेत. शेलार यांना आलेल्या धमकीची मुंबई पोलिसांनी गांभीर्यानं दखल घ्यावी, असं फडणवीस म्हणाले.