हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधला. या प्रसंगी केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही उपस्थित होत्या. मोदींनी मुलांना यशाचा कानमंत्र दिला. तसेच मुलांना हसविले ही. मोदींनी मुलांना अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी मोदींनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसमोरच ‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेचाही उल्लेख केला आणि उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडाले.
मुलं देशाचे भविष्य आहेत असं सांगून त्यांना यशाचा मंत्र दिला. तुमच्या शौर्याची गोष्ट ऐकून माझ्यासह प्रत्येकालाच अभिमान वाटतो. देशातील सर्व मुलांच्या शौर्याच्या गोष्टी जगासोबत शेअर करेन, असं मोदींनी यावेळी सांगितलं.
मुलांशी संवाद साधताना मोदींनी अनेक आठवणी सांगितल्या. तुम्हाला आईची आठवण येत नाही का, असं एकानं त्यांना विचारलं. त्यावर मला जेव्हा आईची आठवण येते तेव्हा सर्व थकवा दूर होतो, असं सांगितलं. राष्ट्रीय पुरस्कारांची व्याप्ती वाढवली आहे. पुरस्कारप्राप्त मुलांवर साऱ्या देशाचं लक्ष जातं. तुम्ही सगळे त्यांचे हिरो बनता, असंही मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी मुलांना अनेक सल्ले दिले. जेव्हा तुम्ही काही यश प्राप्त कराल, तेव्हा आपलं लक्ष्य काय आहे हे विसरू नका. संधीच्या शोधात राहा. मेहनत करण्यापासून अजिबात घाबरू नका, असं त्यांनी सांगितलं.