Ashwani Kumar। आयपीएल २०२५ मध्ये काल पार पडलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात बलाढय मुंबईने केकेआरला चारीमुंड्या चीत केलं. मुंबईने कोलकात्याचा तब्बल ८ गडी राखून दणदणीत पराभव केला. मुंबईच्या या विजयाचा हिरो ठरला तो जलदगती गोलंदाज अश्विनी कुमार…. आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात अश्विनी कुमारने ४ बळी घेतले…. त्याने अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, मनीष पांडे आणि आंद्रे रसेल यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे अश्विनी कुमार नेमका आहे तरी कोण? मुंबईने त्याला कुठे शोधला? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात सुरु झाला…
खरं तर मुंबई इंडियन्स हि फ्रेंचायजी नव्या खेळाडूंना घडवणारी म्हणून ओळखली जाते… मुंबईने आत्तापर्यंत जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, नितीश राणा, यांच्यासारखे अनेक खेळाडू घडवले… या यादीत आता अश्विनी कुमारचे (Ashwani Kumar) नाव आवर्जून घ्यावं लागेल. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित अश्विन कुमारने बुमराह स्टाईल टिच्चून गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाचा सामना खेळत असताना, डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या अश्विनने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद करून चांगली सुरुवात केली. अश्विनी इथेच थांबली नाही आणि त्याने मनीष पांडे, रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल सारख्या महान फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून एकूण ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह तो आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला.
30 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले- Ashwani Kumar
खरंतर, अश्वनी कुमार हा पंजाब मधील एसएएस नगर जिल्ह्यातील मोहालीजवळील झांजेरी गावातील आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध मुंबई इंडियन्सच्या स्काउटिंग टीमने लावला. जसप्रीत बुमराह प्रमाणेच, अश्विनलाही डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट मानले जाते आणि तो फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवण्यासाठी ओळखला जातो. २०२३ च्या शेर-ए-पंजाब टी-२० ट्रॉफीमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. तेव्हापासून मुंबई इंडियन्सच्या नजरा त्याच्यावर होत्या. मुंबई इंडियन्सने त्याला ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले होते. अश्विनी कुमार गेल्या हंगामात पंजाब किंग्जसोबत होता पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. यंदा मात्र मुंबईने त्याला संधी दिली आणि अश्विन कुमारने सुद्धा संधीचे सोने केले.
अश्विनी कुमारच्या कामगिरीबद्दल मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने सुद्धा आनंद व्यक्त केला. अश्विनीने सराव सामन्यात चांगली गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीत वेग आणि स्विंग होता. त्याची अॅक्शनही वेगळी होती आणि महत्वाचं म्हणजे तो डावखुरा गोलंदाज आहे. त्याने आंद्रे रसेलची घेतलेली विकेट खूप महत्त्वाची होती. क्विंटन डी कॉकचा झेल घेतल्याबद्दल सुद्धा पंड्याने अश्विनचे कौतुक केले. एका वेगवान गोलंदाजाला अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहणे खूप छान वाटले असं हार्दिक पंड्या म्हणाला.