जम्मू काश्मीर । हंदवाडा एन्काऊंटरसंबंधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या एन्काऊंटरमध्ये शहीद झालेले २१ राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा हे ४ जणांसह दहशतवादी लपलेल्या घरामध्ये घुसले होते. मात्र, त्यानंतर बराच वेळ त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. अखेर त्यांच्या फोनवर कॉल केला असता समोरून आलेल्या प्रतिसादातून भारतीय जवांनांना एकाच वेळी सावध होण्याचा इशारा, दुःखद वार्ता आणि प्रचंड राग त्यांच्या मनात उत्पन्न झाला. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नल आशुतोष शर्मा यांच्या फोनवर सुरक्षा दलाच्या जवानांनी कॉल केला असता ‘अस्सलाम वालैकुम’ असा समोरून प्रतिसाद मिळाला. या शब्दाने हंदवाडा चकमकीची पूर्ण दिशाच बदलून टाकली.
आशुतोष शर्मा यांच्या मोबाइलवर केलेल्या फोनला समोरुन अस्सलाम वालैकुम हे उत्तर मिळताच बाहेर थांबलेल्या जवानांना आत काही तरी अघिटत घडल्याची कल्पना आली. त्यानंतर त्यांनी अधिक त्वेषाने दहशतवाद्यांवर हल्ला चढवला. कर्नल शर्मा यांच्या टीमने संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घरात प्रवेश केला होता. तिथे अडकलेल्या कुटुंबाची त्यांनी यशस्वी सुटका केली पण ते स्वत: दहशतवाद्यांच्या जाळयात फसले. आणि या एन्काऊंटरमध्ये आशुतोष शर्मा यांच्यासह मेजर अनुज सूद, नायक राजेश कुमार, लान्स नायक दिनेश सिंह आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील सब इन्सपेक्टर सागीर पठान शहीद झाले.
“संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळात आम्ही कर्नल शर्मा आणि त्यांच्या टीममधील अन्य सदस्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होत नव्हता” असे जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले. अखेर चार तासांनी रात्री दहा वाजता कर्नल शर्मा यांना केलेल्या फोनवर समोरुन अस्सलाम वालैकुम हे उत्तर मिळाले. ‘कर्नल शर्मा यांचा फोन दहशतवाद्यांच्या हाती लागण्याचा फक्त एकमेव मार्ग होता हे तिथे असलेल्या अधिकाऱ्याच्या लक्षात आले’ असे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
कर्नल शर्मा यांची टीम आतमध्ये असताना फायरिंग थांबली होती. पण समोरुन ‘अस्सलाम वालैकुम’ उत्तर मिळाल्यानंतर लगेच गोळीबार सुरु झाला. रविवार सकाळपर्यंत हा गोळीबार सुरु होता. तब्बल १३ तास चाललेल्या या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर हैदरचा समावेश आहे. चकमकीच्या सुरुवातीला सुरक्षा दलांना सांभाळून पावले टाकावी लागत होती. कारण त्यांनी एक कुटुंबाला ओलीस ठेवले होते. या कुटुंबाची सुरक्षा सैन्य दलासाठी सर्वात जास्त महत्वाची होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”