नवी दिल्ली | आसाम राज्यातील गुसखोरी रोखण्यासाठी स्थापित केलेल्या राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) या संस्थेचा दुसरा आणि अंतिम मसुदा आज प्रकाशित होणार होता. या मुद्द्यावर कॉग्रेस, सपा, तृणमूल कॉग्रेसच्या सदस्यांनी तुफान गदारोळ केल्याने राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना सदन भरण्यापूर्वी काही सदस्य भेटले आणि सदनात आसामच्या एनआरसी मुद्द्यावर चर्चा घडवण्याची आणि सरकारने आपली बाजू मांडण्याची विनंती केली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच कॉग्रेस, सपा, तृणमूल कॉग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ सुरू केला. अध्यक्ष नायडू यांनी सदनात आसामच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी ही माझी ही इच्छा आहे असे सांगितले तसेच सदनात गृह मंत्री उपस्थित आहेत. मी त्यांना या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यायला सांगतो तरी देखील या तीन पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ थांबवला नाही. चार वेळा तहकूबी देऊन सुध्दा गदारोळ न थांबल्याने राज्यसभा २ वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.