अजब! आसाम एनआरसी डेटा वेबसाईट वरून गायब; गृह मंत्रालयानं दिलं तांत्रिक त्रुटीचं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झालेल्या आसाम एनआरसीचा अंतिम डेटा (माहिती) नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) च्या वेबसाइटवरून गायब झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा डेटा प्रसिद्ध करण्यात आला होता. यावर स्पष्टीकरण देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं आहे की, एनआरसीचा डेटा सुरक्षित असून काही तांत्रिक त्रुटींमुळे तो वेबसाइटवर दिसत नाही. त्याचबरोबर ही समस्या लवकरच सोडविली जाईल असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. तर एनआरसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, विप्रो आयटी कंपनीच्या कराराचे नूतनीकरण न झाल्याने डेटा वेबसाईटवरुन अदृश्य झालाआहे. आसाममधील विरोधी पक्षांनी या घटनेचं वर्णन ‘वाईट कृत्य’ असं केलं आहे.

३१ ऑगस्ट, २०१९ रोजी आसाम एनआरसीची अंतिम यादी प्रकाशित झाल्यानंतर, एनआरसीमध्ये सामील झालेले भारतीय नागरिक आणि एनआरसीच्या बाहेर पडलेले नागरिक यांची संपूर्ण माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट ‘www.nrcassam.nic.in’ वर अपलोड केली गेली होती. हा डेटा अशा वेळी गायब झाला आहे, ज्यावेळी आसाममधील अंतिम एनआरसीची यादी अद्याप भारतीय कुलसचिवांनी अधिकृतपणे अधिसूचित केलेली नाही.

आसाममधील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या ओळखीसाठी आणलेल्या या यादीत १९ लाख लोकांना जागा मिळाली नव्हती. त्यांना आपले नागरिकत्व सिद्ध करावे लागणार होते . केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार ज्यांची नावे एनआरसीमध्ये नाहीत, अशांनी शेवटचा कायदेशीर पर्यायाचा वापर करेपर्यंत त्यांना परदेशी घोषित केले जाणार नाही.

आसाम विधानसभेतील विरोधी पक्षनेते देब्राब्रत साकिया यांनी भारतीय निबंधकांना पत्र लिहून या बाबत लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘अचानक ऑनलाइन डेटा कसा गायब झाला हे एक रहस्य आहे. विशेषत: अशावेळी जेव्हा एनआरसी अधिकाऱ्यांच्या कामाच्या मंद गतीमुळे अपील करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. साकिया यांनी पुढे आपल्या पत्रात लिहितात,” ऑनलाइन डेटा गायब झाल्यानं, हे कृत्य जाणूनबुजून केलं असल्याची शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. अपील प्रक्रियादेखील सुरू झालेली नसताना एनआरसीच्या वेबसाइटवरून डेटा काढला गेला आहे. तेव्हा डाटा गायब करणं हे सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांचे हे मुद्दाम उल्लंघन आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment