हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधान सभा निवडणुकीचे मतदान एकाच टप्प्यात पार पडले आहे. अशातच आज म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. प्रत्येक फेऱ्यां अंती वेगवेगळा निकाल हाती येत आहे. अशातच आता जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गिरीश महाजन विजयी झालेले आहेत. महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे यांना पराभूत करून गिरीश महाजन यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे. जामनेर मधून गिरीश महाजन हे सलग सातव्यांदा निवडून आलेले आहेत.
गिरीश महाजन यांना यावर्षी सातव्यांदा उमेदवारी मिळाली होती आणि त्यांनी यासाठी अगदी सगळीकडे जाऊन प्रचारावर भर दिला होता. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 11 मतदार संघ होते हे मतदार संघ राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि चर्चेचे होते. परंतु आता मतमोजणीनंतर जळगावच्या या राजकारणात महायुती पुन्हा सरस ठरलेली आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे याआधी देखील विजयी झालेले आहेत. या निवडणुकीतही त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत भाजपकडून त्यांना तिकीट मिळाले होते. आणि आता पुन्हा एकदा त्यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे.