हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता महाविकास आघाडी विधानसभा(Maha Vikas Aghadi) निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. नुकतंच मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेत आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणूक लढवणर असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. यानंतर आता लवकरात लवकर जागावाटप करून निवडणुकीच्या तयारीला लागण्याची महाविकास आघाडीची योजना आहे. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे संभाव्य जागावाटप समोर आलं आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस (Congress) मोठ्या भावाच्या रूपात दिसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने (Thackeray Group) सर्वाधिक २१ जागा लढवल्या होत्या. त्या खालोखाल काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवल्या होत्या. यामध्ये ठाकरे गटाला ९, काँग्रेसला १३ आणि राष्ट्रवादीला ( Sharad Pawar Group) ८ जागा जिंकता आल्या. म्हणजेच काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा शिवसेनेपेक्षा जास्त राहिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला जास्त जागा जाऊ शकतात. विधानसभेला काँग्रेस पक्ष १०० ते १०५ जागांवर लढू शकतो. ठाकरेसेना ९० ते ९५ आणि शरद पवार गट ८० ते ८५ जागांवर लढण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’नं आघाडीच्या संभाव्य जागावाटपाबद्दलचं वृत्त दिलं आहे.
दरम्यान, शनिवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्या पत्रकार परिषदेपूर्वी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यात जागावाटपाबद्दल प्राथमिक चर्चा करण्यात आली. तिन्ही पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या जागांवर कोणत्या पक्षांची ताकद आहे याची चाचपणी प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर करणार आहे. प्रत्येकी १०० जागांचे तीन गट करीत जागावाटप चर्चेला प्रारंभ करायचा अन् मग जिथे ज्याचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता सर्वाधिक त्या पक्षाला ती जागा द्यायची, असे प्रारंभिक सूत्र ठरले आहे.