सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक घाटात तीव्र उतारावर मजुरांना घेवून जाणारा टेम्पोला अपघात झाला आहे. या घटनेत 40 मजूर टेम्पोतून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टेम्पोतील मजूर बुलढाणा व अकोला भागातील आहेत. अपघातातील जखमींना सह्याद्री ट्रेकर्सचे जवान बचाव कार्यासाठी मदत करत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वरहून तापोळा मार्गावर हा अपघात झाला आहे. आज शनिवारी सकाळी 8 वाजता हा अपघात मुकदेव घाटात झाला आहे. मजूरांना 407 टेम्पोमधून नेण्यात येत होते. घाटातून मजूरांना घेवून जाताना तीव्र उतारावरून हा टेम्पो कोट्रोशी पुलाजवळ पलटी झाला आहे.
महाबळेश्वर जवळ घाटात टेम्पो पलटी : 40 मंजूर pic.twitter.com/1wecghZaTf
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) January 14, 2023
प्राथमिक माहिती मिळतीनुसार जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. काही जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या अपघातात दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथे पाठविण्यात येणार आहे. अद्याप अधिकृत जखमी व मजूरांची संख्या समोर आलेली नाही. सह्याद्री ट्रेकर्सचे जवान संजय पार्टे, दिपक जाधव, गायकवाड व ग्रामस्थ मदत कार्यात सक्रीय होते.