हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या केरळ राज्यातील सबरीमाला मंदिर एक असं ठिकाण आहे जिथे विविध रहस्यं लपलेले आहेत. या मंदिरात भगवान अयप्पा यांची पूजा केली जाते. पण हे मंदिर सर्वसामान्य व्यक्तीसाठी उघडलेले नाही. कारण अयप्पा यांच्या दर्शनासाठी 41 दिवसांपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करणे आणि सात्विक आहार घेणे बंधनकारक आहे. तर चला या मंदिराची काय रहस्य आहेत , याची पूर्ण माहिती जाणून घेऊयात.
मंदिराच्या रहस्यमय गोष्टी –
भगवान अयप्पा हे भगवान शिव आणि भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाचे पुत्र मानले जातात, म्हणून त्यांना हरिहरपुत्र असेही संबोधले जाते. सबरीमाला मंदिराच्या आसपास अनेक रहस्यं आहेत. विशेषतः मकर संक्रांतीच्या रात्री मंदिराजवळ एक रहस्यमय प्रकाश दिसतो. हा प्रकाश कोणत्याही कृत्रिम स्त्रोताचा नसून, अनेक लोकांना असे वाटते की तो भगवान अयप्पा यांचा दिव्य दर्शन असतो. तसेच, या प्रकाशासोबत एक विचित्र ध्वनीही ऐकू येतो, ज्याला अनेक लोक दिव्य ऊर्जा मानतात.
लाखो भक्त दरवर्षी दर्शनासाठी येतात –
मंदिराला चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 18 पवित्र जिन्यांवर चढावे लागते. प्रत्येक जिन्याचा एक विशिष्ट अर्थ आहे. पहिल्या पाच जिन्यांना मनुष्याच्या पाच इंद्रियांशी जोडले जाते, त्यानंतर आठ जिन्यांना मानवी भावना, तीन जिन्यांना मानवी गुण, आणि दोन जिन्यांना ज्ञान आणि अज्ञानाच्या प्रतीक म्हणून मानले जाते. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर एक रहस्यपूर्ण अनुभव असलेली जागा आहे, जिथे लाखो भक्त दरवर्षी दर्शनासाठी येतात.




