हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसाठी (Atal Setu) टोल एक वर्षासाठी 250 रुपये इतकाच ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर, इतरही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. परंतु यामध्ये अटल सेतूसाठी घेण्यात आलेला निर्णय केंद्रस्थानी ठरला.
टोल कायम ठेवण्याचा निर्णय का?
टोल कायम ठेवण्याच्या निर्णयामागील कारण सांगताना मंत्रिमंडळाने म्हणले आहे की, या पूलाच्या बांधकाम खर्चाची परतफेड करण्यासाठी आणि त्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे सुरळीतपणे करण्यासाठी टोल आवश्यक आहे. 250 रुपये टोल हा प्रवाशांसाठी योग्य आणि वाजवी असल्याचे मंत्रिमंडळाने यावेळी नमूद केले आहे.
दरम्यान, या भव्य प्रकल्पासाठी तब्बल 18 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मुंबई ते नवी मुंबई दरम्यानच्या दळणवळणासाठी अटल सेतू महत्त्वाचा दुवा ठरला आहे. या सेतूमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना जलद व सुलभ प्रवासाचा अनुभव मिळत आहे. तसेच, उद्योग, व्यापार, आणि नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या लोकांसाठीही हा पूल अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
महत्वाचे म्हणजे, राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे पुढील एक वर्षासाठी टोल दरात कोणताही बदल होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पथकरामध्ये वाढ करण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे चालकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पुढील एक वर्षासाठी टोल दरात कोणताही बदल होणार नसल्यामुळे चालकांना दिलासा मिळाला आहे.