हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकालच्या तंत्रज्ञानाच्या जगात बँकेत जाऊन, रांगेत उभा राहून पैसे काढण्यापेक्षा ATM मधून पैसे काढणे सोयीस्कर ठरत. देशभरात ठिकठिकाणी विविध बँकांचे ATM मशीन उपलब्ध असल्याने कमी वेळेत आरामात पैसे निघतात. परंतु आता ATM मधून पैसे काढणे महागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ग्राहकांना मोफत मर्यादा संपल्यानंतर ‘एटीएम’मधून होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी अतिरिक्त दोन रुपये द्यावे लागतील. येत्या १ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. आरबीआयच्या या निर्णयाने ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे.
खरं तर मोफत मर्यादा संपल्यानंतर ‘एटीएम’मधून होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी याच्या आधी १७ रुपये शुल्क होते, आता यात २ रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना १९ रुपये मोजावे लागणार आहेत. बिगर-आर्थिक व्यवहारांसाठीचे शुल्कही एक रुपयाने वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता जरी तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर किती रक्कम जमा आहे हे जरी बघायचं असलं तरी आता प्रत्येक वेळी सहा रुपयांऐवजी सात रुपये चार्ज आकारला जाईल. शुल्कातील ही वाढ देशभर लागू होईल आणि त्याचा परिणाम ग्राहकांवर, विशेषतः लहान बँकांच्या ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. या बँका एटीएम पायाभूत सुविधा आणि संबंधित सेवांसाठी मोठ्या वित्तीय संस्थांवर अवलंबून असतात, ज्यामुळे त्यांना वाढत्या खर्चाचा सामना करावा लागतो.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे डिजिटल व्यवहारांना आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. हे व्यवहार अधिक सोप्पे आणि कमी खर्चिक आहेत. ‘एटीएम’मधून पैसे काढण्याचा खर्च वाढल्याने आता ग्राहक डिजिटल व्यवहार पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे वळण्याची शक्यता आहे. सरकार रोख व्यवहारांचे प्रमाण कमी करण्यासाठी डिजिटल व्यवहारांना आधीच प्रोत्साहन देत आहे.
आता आपण बघुयात इंटरचेंज फी म्हणजे नेमकी कोणती फी? तर इंटरचेंज फी म्हणजे एक बँक दुसऱ्या बँकेला देत असलेली रक्कम, जेव्हा ग्राहक दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरतात तेव्हा इंटरचेंज शुल्कच आकारलं जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही ICICI बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी HDFC एटीएम कार्ड वापरत असाल, तर HDFC तुमच्याकडून इंटरचेंज शुल्क आकारेल. हे शुल्क प्रत्येक व्यवहारासाठी एक निश्चित रक्कम आहे आणि ते ग्राहकांना बँकिंग खर्च म्हणून आकारले जाते.