हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एटीएम व्यवहारांशी संबंधित एक मोठा बदल 1 मे 2025 पासून लागू होणार आहे. ग्राहकांना आता एटीएममधून (ATM) पैसे काढताना अधिक शुल्क भरावे लागणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल देशांतर्गत वित्तीय आणि गैर-वित्तीय व्यवहारांसाठी लागू होईल.
इंटरचेंज शुल्कात वाढ
NPCI च्या नव्या निर्देशांनुसार, एटीएममधून पैसे काढण्याच्या व्यवहारांसाठी (फायनान्शियल ट्रान्झॅक्शन) इंटरचेंज शुल्क 17 रुपयांवरून 19 रुपये करण्यात आले आहे. तसेच, गैर-वित्तीय व्यवहारांसाठी (जसे की शिल्लक तपासणी) हे शुल्क 7 रुपये निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, या शुल्कावर वस्तू आणि सेवा कर (GST) वेगळा आकारला जाईल.
NPCI ने या बदलांना लागू करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून मंजुरी घेतली आहे. RBI ने NPCI ला पत्राद्वारे सूचना देत सांगितले की, एटीएम नेटवर्कद्वारे शुल्क निश्चित करता येऊ शकते, तसेच NPCI ने याची अंमलबजावणी तारीख RBI ला कळवावी.
कुठे लागू होणार नाही?
संशोधित इंटरचेंज शुल्क मायक्रो-एटीएम, इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट सिस्टम (कार्ड आणि UPI आधारित व्यवहार), तसेच आंतरराष्ट्रीय एटीएम व्यवहारांना लागू होणार नाही. नेपाळ आणि भूतानमध्ये होणाऱ्या व्यवहारांसाठीही या नव्या शुल्काचा परिणाम होणार नाही.
मोफत एटीएम व्यवहारांची संख्याही होणार कमी
एटीएम व्यवहारांसंदर्भातील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे मोफत पैसे काढण्याच्या व्यवहारांमध्ये कपात होणार आहे. सध्या खातेदाराला त्याच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएमशिवाय इतर बँकेच्या एटीएममधून महिन्याला 5 वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा आहे. मात्र, हा आकडा आता कमी करून 3 पर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे. लवकरच हा नियम लागू करण्यात येईल.
एटीएम वापरणे महाग होणार
या नव्या बदलांमुळे ग्राहकांवरील आर्थिक भार वाढणार आहे . आता त्यांना एटीएम व्यवहार करण्याआधी शुल्काचा विचार करावा लागेल. विशेष म्हणजे, इतर बँकांच्या एटीएमचा वापर करताना मर्यादित मोफत व्यवहारांमुळे लोकांना अधिक शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, NPCI च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2025 मध्ये नॅशनल फायनान्शिअल स्विच (NFS) नेटवर्कवर 31.5 कोटी व्यवहार नोंदवले गेले. ही संख्या फेब्रुवारी 2024 मध्ये 36.5 कोटी होती, त्यामुळे वार्षिक आधारावर 13.7 टक्के घट झाल्याचे दिसून येते. देशभरात सध्या 2.65 लाख एटीएम कार्यरत असून, NPCI शी संलग्न बँकांची संख्या 1349 वर पोहोचली आहे.