नवी दिल्ली । भारत-चिनी सीमेवरील गलवान खोऱ्यातील चीनच्या भ्याड हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर देशभरात चीनविरोधी लाट उसळत चिनी मालावर आणि चिनी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. इतकेच नव्हे तर या काळात चीनवर अवलंबून न राहता ‘आत्मनिर्भर भारत’ चा नारा बुलंद करण्यात आला होता. मात्र, आता याच ‘आत्मनिर्भर भारत’च्या नाऱ्याला हरताळ फासला गेलाय. दिल्ली-मेरठ आरआरटीएस प्रोजेक्टमधील न्यू अशोक नगर ते शाहिबाबाद मार्गावर जमिनीखालून जाणारा ५.६ किमीचा मार्ग तयार करण्यासाठी एका चिनी कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाने (NCRTC) शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीला हे कंत्राट दिलं आहे. एनसीआरटीसी देशातील पहिली रिजनल रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम उभारत आहे. यावेळी त्यांनी चिनी कंपनीला कंत्राट देताना संपूर्ण प्रक्रिया आणि नियमांचं पालन केलं जात असल्याचं सांगितलं आहे.
“कंत्राट देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरुन परवानगी घेण्यात आली असून सर्व नियमांचं आणि प्रक्रियेचं पालन करुनच देण्यात आलं आहे. दिल्ली-गाजियाबाद-मेरठ कॉरिडोअरच्या सर्व नागरी कामांचं कंत्राट देण्यात आलं असून वेळेत काम पूर्ण होईल अशा वेगाने बांधकाम सुरु आहे,” अशी माहिती एनसीआरटीसीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
गतवर्षी जून महिन्यात शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीची बोली सर्वात कमी असल्याचं समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. लडाखमधील सैन्य संघर्षामुळे भारत आणि चीनमध्ये तणाव असतानाच हे कंत्राट चिनी कंपनीला देण्यात आले आहे. ८२ किमी लांबीच्या दिल्ली-गाजियाबाद-मेरठ आरआरटीस कॉरिडोअरला एशियन डेव्हलपमेंट बँक फंडिंग करत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’