सातारा | सध्या आंबेजोगाई येथे न्यायाधीश असलेले चंद्रमोहन खारकर यांचे मोठे बंधू अँड.राममोहन खारकर (वय- 37) यांच्यावर शाहूनगर चौकात शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता दहा ते बारा जणांनी गाडी अडवून प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. न्यायाधीश हे सातारा- शाहूनगर येथे वास्तव्यास आहेत.
अँड. राममोहन खारकर हे कारमधून रात्री घरी जात असताना अचानक दहा ते बारा जणांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डोळ्याला गंभीर जखम झाली आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या कारचीही तोडफोड केली. या प्रकारानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले.
अँड. खारकर यांच्यावर खुनी हल्ला कोणी व कोणत्या कारणांसाठी केला, हे अद्याप पुढे आले नाही. जिथं हा हल्ला झाला. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सातारा शहर पोलिसांनी सुरू केले असून, लवकरच हल्लेखोर हाती लागतील, असे पोलिसांनी सांगितले.