औरंगाबादेत उद्योजकांवर होणारे हल्ले गंभीर; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : औरंगाबादेत उद्योजकांवर होणाऱ्या घटनांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पत्र लिहिले आहे. तसेच हे हल्ले गंभीर आहेत असा उल्लेख देखील पत्रात करण्यात आला आहे.

आपल्या पत्रात फडणवीस म्हणतात, की उद्योगनगरी औरंगाबादेमध्ये सातत्याने उद्योजकांवर हल्ले होते असण्याच्या घटना अलीकडच्या काळात प्रकाशात आल्या आहेत. दि. ८ ऑगस्ट रोजी भोगले उद्योग समूहाचे प्रबंध संचालक नित्यानंद भोगले, उत्पादन व्यवस्थापक सोनगीरकर, कार्मिक व्यवस्थापक भूषण व्याहाळकर या तिघांना बाहेरुन आलेल्या १५-२० कथित गुंडांनी मारहाण केली. या संदर्भातील संपूर्ण फुटेज पोलिसांकडे उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची चिथावण नसताना ही मारहाण झाली आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक झाली तर काही फरार आहेत. तसेच दि. १० ऑगस्ट रोजी वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या गणेश कोटिंग समूहावर हल्ला करण्यात आला. लेबर कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्या. या मागणीसाठी हे लोक गेले होते. या दोन घटनांनंतर आता इतरही अनेक छोट्या उद्योगांच्या समस्या पुढे येत असल्याचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीसांनी सांगितले.

पेट्रोल भरुन पेट्रोलचे पैसे न देणे, हॉटेलमध्ये जेवल्यावर त्याचे पैसे न देणे, वाहनांची दुरुस्ती केल्यावर त्याचे पैसे न देणे, अशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत. विशेषतः अलीकडच्या ८-१० महिन्यांत अशा तक्रारी वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकरणात पोलिसांत तक्रारी झाल्यानंतर सामान्य कलमांन्वये कारवाई होते. परिणाम वर्षानुवर्ष न्यायालयात तक्रारी प्रलंबित राहतात आणि कितीतरी वर्षांनी शिक्षा सुनावली जाते. अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास त्याचा राज्यात गुंतवणूक येण्याच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो. शिवाय एक वेगळे चित्र गुंतवणूकदारांच्या मनात उभे राहते. त्यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी. यातून मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी अशा घटनांकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या सर्व घटनांमध्ये कठोरातील कठोर कलमे लावून हे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोवर या कथित गुंडांवर जरब बसणार नाही. आपण स्वतः यात लक्ष घालून तातडीने कारवाई कराल, ही आशा करतो, अशी अपेक्षा पत्राच्या शेवटी फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment