Wednesday, June 7, 2023

अपयश लुंगीत लपवण्याचा प्रयत्न : शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर जळजळीत टीका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पा चित्रपटातील नायकाप्रमाणे लुंगी घालून फोटो शुट केले होते. या फोटो शुटवर आता टीका होत आहे. पाच वर्षांच्या कामाचे अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करत असल्याची खोचक टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर केली. या टीकेला आता खा. भोसले काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुष्पा चित्रपटाची चर्चा संपुर्ण देशभरात आहे. त्यात आता या सिनेमाने खासदार उदयनराजे भोसले यांनाही भूरळ पाडली. त्यामुळे या सिनेमातील नायकाप्रमाणे खासदार उदयनराजे यांनी पोवई नाक्यावरील सेल्फी पॉईंट येथे लुंगी घालून फोटो सेशन केले. या फोटो सेशनवर आता आमदार शिवेंद्रराजे यांनी टीका केली आहे.

मी उभारलेल्या कामाच्या प्रेमात उदयनराजे पडले आहेत हे चांगले आहे. उदयनराजेंच्या कामाच्या प्रेमात कोण पडेल अशी काम त्यांच्याकडे नाहीत. आपण केलेल्या पाच वर्षांच्या कामाचे अपयश हे लुंगी मध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करत असल्याची खरमरीत टीका शिवेंद्रराजे यांनी केली.

सातारकरांनी त्यांच्याकडे मनोरंजन म्हणून बघावे. राजकीय लोकांना देखील आता फॅन्सी ड्रेस पार्टी करावी लागत आहे, हा गंमतीचा भाग असल्याचे सांगत उदयनजेंच्या लुंगी घालून केलेल्या फोटो सेशनवर शिवेंद्रराजेंनी चांगलीच टीका केली आहे.