औरंगाबाद – वैजापूर तहसिल कार्यालयात चारचाकी वाहन भाड्याने दिले खरे; मात्र त्या कार्यालयाकडून भाडेच मिळेना. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने हतबल झालेल्या वैजापूर येथील वाहनमालक विलास लांडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. झाल्या प्रकारामुळे परिसरात एकच गडबड उडाली होती. हा प्रकार काल कार्यालये बंद होण्याच्या काही वेळेआधी घडला.
यासंदर्भात लांडगे यांनी जिल्हाधिकारी यापूर्वी इशारावजा निवेदन दिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, वैजापूर तहसिल कार्यालयात तहसिलदारांना चारचाकी वाहन नसल्याने त्यांनी 27 ऑगष्ट 2018 पासून तहसील कार्यालयाला त्यांच्या मालकीचे एम.एच. 17 एझेड 8366 या क्रमांकाचे चारचाकी वाहन भाडेतत्वावर दिले होते. अनेकदा पाठपुरावा करून देखील त्यांना वाहनाचे भाडे मिळाले नाही यासाठी लांडगे यांनी 16 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाहनाचे 15 लाख 20 हजार रूपये भाडे मिळावे अशी मागणी करत जर थकबाकी मिळाली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
निवेदनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने 17 मार्चरोजी वैजापूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना या प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे पत्र देण्यात आले. मात्र, कुठलीच हालचाल होत नसल्याने सोमवारी लांडगे यांनी सांयकाळी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले आणि काडीपेटी हातात घेत असतानाच तेथील एका व्यक्तीने त्यांच्यावर झडप घेऊन पकडले, त्यामुळे अनर्थ ठळला. या प्रकारामुळे या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण झाले. दरम्यान पोलीसही घटनास्थळी आले आणि त्यांनी विलास लांडगे यांना ताब्यात घेतले.