पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे की ते…; अतुल भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून महाराष्ट्र्भर संप केला जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेणार आहेत. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. “शरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे ज्यामुळे ते एसटी संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेणार आहेत? असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आज ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “शरद पवार यांच्या उपस्थितीत एसटी संपाबाबत मह्त्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी १२.३० वाजता बैठक होणार आहे. शरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे ज्यामुळे ते एसटी संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेणार आहेत? मुख्यमंत्री काय करतायत?,” असा सवाल ट्विटच्या माध्यमातून भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

 

भाजप नेते भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून थेट राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवरून त्यांच्यावरही निशाणा साधला आहे. भातखळकर यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी आणि भातखळकर यांच्यातील वाद आता पुन्हा रंगणार आहे.