खटाव | औंध पोलिसांच्या ताब्यात असलेला पोक्सो प्रकरणातंर्गत संशयित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून संशयिताने ग्रामीण रुग्णालयातून पलायन केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, खटाव तालुक्यातील कळंबी येथील अनिकेत काळे (वय- 20) यांच्या विरोधात औंध पोलिस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, तो फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध घेवून त्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले होते. अटक केल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडीही कोर्टाने दिली होती. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास वैद्यकीय तपासणी करण्यासाठी औंध पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी संशयित अनिकेत काळे याला ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले होते.
दरम्यान, दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून अनिकेत काळे याने तेथून पलायन केले. यानंतर औंध पोलिस ठाण्याच्या कर्मचारी औंध, पुसेसावळी, पळशी, खरशिंगे, पुसेगाव, वडूज या भागात संशयिताचा कसून शोध घेत होते. मात्र रात्री उशीरापर्यंत संशयिताचा कोणताही शोध न लागल्याने औंध पोलिस कर्मचारी हवालदिल झाले होते. दरम्यान, या घटनेची सर्वत्र चर्चा सुरु होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.