औरंगाबाद प्रतिनिधी । शिर्डी येथील खराब वातावरणामुळे तेथील विमानतळावरील विमानांचे उड्डाण काही दिवसांपासून ठप्प झाले होते. मात्र अधिक दिवस उड्डाण ठप्प राहिल्यामुळे विमानांचे ‘स्लॉट’ रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र यावर पर्याय काढत स्लॉट कायम राहण्याच्या दृष्टीने विमान कंपन्यांकडून आणि विमान प्राधिकरणाकडून औरंगाबादहून उड्डाण करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे स्पाईस जेटने चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरूहून शिर्डीला जाणारी विमाने २२ नोव्हेंबरपासून औरंगाबादहून उड्डाण करीत होते. स्पाईस जेट पाठोपाठ ‘इंडिगो’नेही औरंगाबादहून विमानांचे संचालन करण्याचे नियोजन केले.
पण काल बुधवारपासून स्पाईस जेटच्या विमानांनी पूर्वीप्रमाणे शिर्डीहून झेपावण्यास सुरुवात केली. मात्र औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाची दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची क्षमता आहे हे यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात येथून विमानसेवा वाढण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान चिकलठाणा विमानतळावरून नियमित १० विमानांची ये – जा आहे. यामध्ये उदयपूरचे विमान आठवड्यातून ३ दिवसांसाठी उड्डाण घेत आहे. मात्र शिर्डी येथील विमाने औरंगाबादला वळविण्यात आल्याने गेली काही दिवस दिवसभरात उड्डाण घेणाऱ्या विमानांची संख्या २० वर गेली होती. येथील व्यवस्थापनाकडून वाढलेल्या विमानांची आणि प्रवासी संख्येची सक्षमपणे हाताळणी केली गेली.
त्यातून औरंगाबाद विमानतळ व्यवस्थापनाची क्षमता स्पष्ट होत आहे. याचा भविष्यात विमानसेवा वाढण्याच्या दृष्टीने फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर वाढलेली गजबज आता कमी झाली आहे. मात्र १५ डिसेंबरनंतर विमानतळावर केवळ नियमित विमानांच्या प्रवाशांची गर्दी राहिल असे व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे.