औरंगाबाद बनले परीक्षा घोटाळ्यांचे केंद्र ! प्रसिद्ध अकॅडमीचे संचालक पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील कर्मचारी भरतीनंतर म्हाडाच्या कर्मचारी भरती परीक्षेतील पेपर फुटीचे रॅकेट रविवारी उघड झाले आणि औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. कारण राज्यात गाजत असलेल्या या दोन्ही प्रकरणात औरंगाबाद, बीड आणि जालना या मराठवाड्यातील सूत्रधार काम करत असल्याचे उघड झाले. म्हाडाच्या पेपरफुटीत औरंगाबादच्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे प्रमुख सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे. तर यापूर्वीच्या आरोग्य विभागाच्या पेपरफुटीत सातारा परिसरातील संदीप भुतेकर याचे नाव समोर आले असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, पालक आणि एकूणच शिक्षण क्षेत्राला मोठा हादरा बसल्याचे चित्र आहे.

आरोग्य भरती घोटाळ्यात बीड बायपासवरील नवस्वराज्य पोलीस आणि सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचा संदीप भुतेकर आरोग्य भरतीच्या घोटाळ्यात आरोपी म्हणून सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची क्रेझ वाढली असून यातील यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी क्लासेसचे संचालक परीक्षेच्या आधीच पेपर विकत घेत असल्याचेही उघड झाले आहे.

म्हाडाची परीक्षा घेण्याचे कंत्राट ज्या जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आले होते, त्याच कंपनीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख हा पेपरफुटीमागील सूत्रधार असल्याचे रविवारी उघडकीस आले. देशमुखने नंतर औरंगाबादमधील दोन क्लासेसच्या तीन प्राध्यापकांनीच सर्वाधिक पेपरची मागणी केल्याचे सांगितले. हे लोक पाच ते सहा लाख रुपयांमध्ये पेपर विकत घेत असल्याचेही चौकशीअंती उघडकीस आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यामागे 60 ते 70 हजार रुपये मिळवत होते.

Leave a Comment