औरंगाबाद | पैशासाठी नेहमीच धमक्या देऊन लुटण्याचा प्रकार, मामाची केलेली हत्या त्यामुळे डोक्यात राग असलेल्या तरुणासह त्याच्या साथीदारांनी शेख माजीद उर्फ मुर्गी शेख अली (28, रा. खडकेश्वर) याचा काटा काढला. त्याच्या हत्येची घटना 29 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली होती. छावणी, क्रांतीचौक आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत एका अल्पवयीन बालकासह तिघांना ताब्यात घेतले. त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेख परवेज शेख समद (21, रा. बारापुला गेटजवळ) आणि अरबाज वाहीद खान (19, रा. भीमबावडी, मोगलपुरा) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
आरेफ कॉलनीतील मजाज लीडर यांची सन 2014 मध्ये बाबलासह त्याच्या पाच साथीदारांनी क्रुरपणे हत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह हिमायतबागेतील नाल्यात पुरुन ठेवण्यात आला होता. कालांतराने बाबला याला प्लंबरच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तर याच प्रकरणात सहभागी असलेला माजीद उर्फ मुर्गी हा जामीनावर सुटला होता. तेव्हापासून माजीद उर्फ मुर्गी हा मजूरीचे काम करत होता. पण दुसरीकडे तो नशा करण्यासाठी तरुणांना लुटायचा. गरमपाणी, बारापूल्ला ते पानचक्की या नाल्याच्या परिसरात त्याचा साथीदारांसह वावर होता. नशा करण्यासाठी तो साथीदारांसह नाल्या-नाल्याने फिरायचा. शेख परवेज, अरबाज खान व त्यांचा साडेसोळा वर्षीय एक अल्पवयीन साथीदार 29 मे रोजी रात्री बारापूल्ला नाल्याजवळ मोबाईलवर पब्जी गेम खेळत होते. याचदरम्यान, रात्री बाराच्या सुमारास वडीलांकडून शंभर रुपये घेत माजीद उर्फ मुर्गी हा चाकु घेऊन घराबाहेर पडला होता. त्यापुर्वी परवेजने माजीद उर्फ मुर्गीच्या मोबाईलवर संपर्क करुन त्याला बोलावून घेतले होते. बारापुला नाल्याजवळ येताच त्याने शेख परवेजकडे पैशांची मागणी केली. मामाची हत्या केल्यामुळे परवेज नेहमी त्याच्यापासून घाबरुन राहायचा. पण रात्री खिशात सात हजार रुपये असल्याने शेख परवेजने आता माजीद उर्फ मुर्गीला पैसे द्यायचे नाही असे ठरवले होते. पैसे हिसकावण्यासाठी माजीद उर्फ मुर्गीने थेट परवेजच्या गळ्याला चाकु लावला. त्यामुळे परवेज घाबरुन गेला. त्याने व अरबाज याने गोडीगोडीत बोलून माजीद उर्फ मुर्गीला नाल्यातून चढावावर आणले. त्यानंतर त्याला अल्पवयीन साथीदार व अरबाज यांनी पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत माजीद उर्फ मुर्गी पुरता घायाळ झाला. त्याच्या अंगावरील शर्ट देखील या तिघांनी काढला. मारहाण सुरू असतानाच माजीद उर्फ मुर्गी घसरुन नाल्याजवळील मोकळ्या जागेत जाऊन पडला. त्याच्या मागावरच असलेल्या तिघांनी त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड टाकला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिघांनी तेथून पळ काढला.
मामाच्या हत्येचा राग…
बाबला हा पुर्वी सुपारी किलर इम्रान मेहंदीच्या संपर्कात होता. सन २०१३ मध्ये इम्रान मेहंदीच्या गँगला अटक झाल्यानंतर बाबलाने त्याची स्वतंत्र गँग तयार केली होती. त्यानंतर बाबलाच्या गँगमध्ये माजीद उर्फ मुर्गी सहभागी झाला होता. त्यातच माजीद उर्फ मुर्गीने मामा मजाज लीडरची हत्या केल्याचा राग परवेजच्या डोक्यात होता. अखेर त्यातून परवेजने साथीदाराच्या मदतीने त्याचा काटा काढला.
हत्येनंतर ठेवले स्टेटस्…
माजीद उर्फ मुर्गीची हत्या केल्यानंतर रात्री तिघेही घटनास्थळावरुन पसार झाले. यानंतर परवेजने चुकीला माफी नाही असे मोबाईलवर व्हाटसअप स्टेटस् ठेवले होते. तिघेही अट्टल गुन्हेगार नसल्यामुळे पोलिसांच्या अलगद हाती लागले. या हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखा, छावणी आणि क्रांतीचौक पोलिसांचा एक व्हाटसअप ग्रुप देखील तयार करण्यात आला होता. रविवारी पहाटे तिघांना ताब्यात घेण्यात आले.