अबब..! जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात २६ रुग्णांचा बळी

औरंगाबाद जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेसमोर मृत्यूदर रोखण्याचे आव्हान

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोनाने आपला विळखा आणखी घट्ट केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२६) दिवसभरात २६ रुग्णांचा बळी घेत, नवा उच्चांक केला आहे. कोव्हिड रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्यासह वाढता मृत्यूदर रोखण्याचे आव्हान आता प्रशासनासह आरोग्य यंत्रणेसमोर आहे.

मार्च महिन्यात २० आणि २२ रोजी मृत्यूचा आकडा हा २० च्या वर गेला होता. तर २३ मार्च रोजी सर्वाधिक २५ रुग्ण दगावलेले आहेत. शुक्रवारी घाटीत १८ रुग्ण, मिनी घाटीत ३, प्राथमिक आरोग्य केंद्रात २ आणि खासगी रुग्णालयात ३ असे एकूण २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी दिवसभरात बाधित रुग्णांची संख्या १७८७ इतकी झाली आहे.

या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७५ हजारांवर गेली आहे. आतापर्यंत ७५६३५ नागरिक कोरोनाने बाधित झाले आहेत. तर १०१४ जणांना घरी सोडण्यात आल्याने, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५९१६८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १४९३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

You might also like