औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील २४ तासांत लक्षणीय वाढ झाली आहे. २४ तासांत शहरात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली असून, सध्या जिल्ह्यात एकूण १०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. या बाधितांमध्ये पाच वर्षांपासून ते ९५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व बाधित शहर परिसरातील आहेत.
शहरात सोमवारी (२७ एप्रिल) दुपारपर्यंत बाधितांचा आकडा ५३ होता. मात्र सोमवारी सायंकाळी एकाचवेळी २९ नवे बाधित आढळून आले. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत एकूण बाधितांचा आकडा ८२ झाला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये आणखी १३ बाधित नव्याने आढळून आले. एकूण बाधितांचा आकडा ९५ झाला. त्यानंतर दुपारी साडेतीनला झालेल्या चाचण्यांमध्ये आणखी १० बाधित असल्याचे स्पष्ट झाले आणि बाधितांचा आकडा १०५ झाला आहे. त्यामुळे केवळ २४ तासांत शहरातील बाधित ५३ वरून १०५ वर पोहोचले आहेत. हे सर्व बाधित किलेअर्क, पैठण गेट, भीमनगर-भावसिंगपुरा, दौलताबाद, संजयनगर, मुकुंदवाडी, बडा तकिया मशीद, सिल्लेखाना, भावसिंगपुरा, नूर कॉलनी, आसेफिया कॉलनी, काला दरवाजा आदी भागांतील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यातील बहुसंख्य बाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर काही बाधितांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) उपचारासाठी दाखल केलं आहे. तसेच आतापर्यंत शहरातील सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.