औरंगाबाद । राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब झाली आहे. ही तरुणी गायब असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या संपूर्ण यंत्रणा या तरुणीचा शोध घेत आहे. आरोपीला अटक करत नाही तोवर पोलिसांनी घरी येऊ नये, असा पवित्रा तरुणीने घेतला होता. औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका अल्पसंख्याक तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. तरुणीने तक्रारीत म्हटले होते की, 10 नोव्हेंबर रोजी मला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावलं आणि 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भेटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला. तरुणीने याबाबत औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मेहबूब शेख यांचा खुलासा
गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या आठवड्यात शेख यांनी याबाबत खुलासा केला होता. त्यांनी म्हटले होते की, “औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकार मित्राकडून मिळाली. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे मेहबूब इब्राहिम शेख या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली. मी कधीही संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो नाही किंवा फोनवरही बोललेलो नाही. मी 10 आणि 11 तारखेला मुंबईत होतो. माझे मुंबईत कार्यक्रम होते. 14 नोव्हेंबरला मी बीड जिल्ह्यातील शिरुर कासार या माझ्या गावाकडे होतो. पोलिसांना सर्व पुरावे तसंच माहिती देण्यास मी तयार आहे. या प्रकरणामागे कोण आहे?, याचा पोलिसांनी शोध घ्यावा”.
मेहबूब शेख यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर करत संबंधित तरुणीने केलेले सगळे आरोप फेटाळून लावले. “संबंधित तरुणीशी माझा कसलाही संबंध नाही. मी तिला कधीही पाहिलं नाही किंवा भेटलेलो नाही. एखाद्या व्यक्तीने एवढ्या मेहतीने उभं केलेलं राजकीय आयुष्य इतक्या घाणेरड्या आरोपांनी उध्वस्त करु नये. यामागे कुणाचं षडयंत्र आहे?, या प्रकरणामागे कोण राजकीय लोकं आहेत?, त्या महिलेचा बोलविता धनी कोण आहे?, याची पोलिसांनी कसून चौकशी करावी. गरज पडली तर माझी नार्को टेस्टचीही तयारी आहे आणि जर आरोप सिद्ध झाले तर मी फासावर जायला तयार आहे”, असं मेहबूब यांनी फेसबुक व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं. (woman who lodged a rape complaint against NCP leader Mehboob Sheikh has gone missing)
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’