औरंगाबाद : सात जूनपासून ब्रेक द चेनचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या औरंगाबद शहर अनलॉक करण्यात आले. मात्र ग्रामीण भागात काही निर्बंध कायम होते. ग्रामीण भागातही पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांपेक्षा खाली आल्याने आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निर्बंध आजपासून हटवण्यात आले आहेत. शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आजपासून जिल्हयात सर्व निर्बंध हटवले आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिक पांडेय यांनी जिल्ह्यात 11 मार्चपासून अंशतः लॉकडाऊन लावले होते. त्यांनतर रुग्ण वाढल्याने कडक लॉकडाऊन लावण्यात आले. यामुळे रुग्ण संख्या कमी झाली. त्यामुळे 1 जूनपासून ब्रेक द चेनच्या निर्बंधामध्ये शितीलता देण्यास सुरुवात झाली. यानंतर शहर अनलॉक करण्यात आले आणि आता ग्रामीण भागातीलही रुग्णसंख्या कमी झाल्याने ग्रामीण भागही अनलॉक करण्यात आला आहे.
कार्यक्रमासाठी निर्बंध कायम
जिल्हा अनलॉक करण्यात आला असला तरी आजपासून लग्न समारंभ आणि अंत्यविधी सांस्कृतिक कार्यक्रम राजकीय सभा संमेलनामध्ये नागरिकांच्या उपस्थितीत निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार मंगल कार्यालय, लॉन, हॉलची, आसन व्यवस्थेच्या 50 टक्के उपस्थिती सक्ती केली आहे. तसेच अंत्यविधीसाठी 100 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.